मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावरही पडल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५११ रिक्त पदांची MPSC कडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (ajit pawar announces that finance department approved recruitment of 15 511 vacancies in the state)
एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५११ रिक्त पदांची MPSC कडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
“शेतकरी देशाचे दुश्मन आहे की पाकिस्तानातून आलेत?” भुजबळांची मोदी सरकारवर टीका
महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार
ज्या ज्या विभागांनी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले, त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार, २०१८ पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. यापैकी गट अ - ४४१७, गट ब - ८०३१, तर गट क - ३०६३ इतकी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.