मोरगाव - सिंचन घोटाळ्याबाबत केले जात असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. याबाबत ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ होईल; तसेच विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा बोलण्यावर ताबा नसून, आताचे सरकार रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.मोरगाव (ता. बारामती) येथे दि. ४ रोजी येथील मयूरेश्वर मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यात सर्वाधिक उसाला भाव सोमेश्वर कारखान्याने दिला असून सध्या कारखाना कर्जमुक्त आहे. सत्ताधारी पक्षातील गडकरी, दानवे व मुंडे यांचेही साखर कारखाने असताना राज्यात केवळ आमचेच साखर कारखाने असल्याचा बोलबाला विरोधक करत आहेत. नरेंद्र मोदींच्या हवेमुळे अनेकांना मंत्रिपद मिळाले आहे.मात्र, त्याच हवेमुळे स्वयंपाकाचा गॅस एक हजारावर गेला, असा टोला त्यांनी लवगवला. सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाचे कर्ज केवळ केवळ ५९ मिनिटात मात्र हे फसवे गणित आहे. शेतकºयांनी दुधाचा धंदा करताना भेसळ करू नका असे मार्गदर्शन या मेळाव्यात केले. यावेळी पुणे जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, सभापती संजय भोसले, शारदा खराडे, राहुल भापकर, सरपंच निलेश केदारी, उपसरपंच निशा तावरे, पोपट तावरे, अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती सदस्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सरपंचांचा कडून पाणी व जनावरांना चारा याबाबत आढावा घेण्याच्या सुचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
घोटाळ्यातील आरोप बिनबुडाचे - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 1:29 AM