येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट हे महायुतीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढणार आहेत. मात्र महायुतीमधील घटक पक्षांमध्ये विविध मतदारसंघांवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाची जागावाटपावेळी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहेत. त्यातच अजित पवार गटाकडून भापपाचे विद्यमान खासदार असलेल्या मतदारसंघांवर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अहमदनगरनंतर आता भंडारा-गोंदिया मतदारसंघावरही अजित पवार गटाने दावा केला आहे. याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सूचक विधान केलं आहे.
महायुतीच्या जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेणार आहोत. आमच्या जागावाटपामध्ये फार पाही अडचण येणार नाही. लोकसभेच्या हिशोबाने भाजपा मोठा पक्ष आहे. त्यांचे ३०० हून अधिक खासदार आहेत. जागावाटपामध्ये त्यांचे जे काही दावे असतील आणि आमचे जे काही दावे असतील त्याबात आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. कुठलीही अडचण येणार नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
यावेळी भंडारा गोंदिया मतदारसंघाबाबत भाष्य करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, भंडारा गोंदिया मतदारसंघाशी असलेलं माझं नातं सर्वांना माहिती आहे. मी तिथून अनेकदा खासदार म्हणून निवडून आलो आहे. हा माझा गृहजिल्हा आहे आणि विदर्भामध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक बळकट आहे. त्यामुळे त्या जागेवर आम्ही इच्छूक असणं स्वाभाविक आहे. पण चर्चा झाल्याशिवाय माझ्यासारख्या जबाबदार व्यक्तीने त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.