Ajit Pawar on Shivsena Dasara Melava: शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायमच चर्चेचा विषय असतो. सुरूवातीला या मेळाव्यात स्व. बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष असायचे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray) पण सध्या दसरा मेळावा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड आक्रमक आहेत. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाला बीकेसी येथील मैदानावर मेळाव्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, शिवतीर्थावरील परवानगीबाबत अद्यापही पेच कायम आहे. या मुद्द्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केले.
"दसरा मेळाव्यासाठी अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रयत्न करावा. वास्तविक शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवाजी पार्कमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झाला आणि त्यानंतर बाळासाहेबांनी ती जबाबदारी दसरा मेळाव्यातच उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षप्रमुख म्हणून सोपवली होती. शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे हे करतील असे बाळासाहेबांनी जाहीर केले होते. आता बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाला मेळावा घ्यायला परवानगी मिळाली आहे तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांना परवानगी द्यायला हवी. दोन्ही मेळावे व्हावेत आणि दोघांचे विचार राज्यातील जनतेने ऐकावेत", असा उपाय अजित पवार यांनी सुचवला.
"उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. ते त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. जसे आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतो, गांधी नेहरुंचे नाव कॉंग्रेस घेते, तसेच शिवसैनिक बाळासाहेबांचे नाव घेतो. जी पुण्याई आहे ती आहे. आपल्या वडिलांचे, आपल्या पूर्वजांचे नाव घेणे ही परंपरा आजची नाही. देशात ही पहिल्यापासून आहे आणि ती पुढे चालतच राहणार आहे", असेही अजित पवार म्हणाले.