...तर आबा वाचले असते : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:35 AM2018-02-12T02:35:13+5:302018-02-12T02:35:27+5:30
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ रविवारी अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथे करण्यात आला.
पुणे : माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील अनेक तरुणांना व्यसनांपासून वाचवले. मात्र ते स्वत: तंबाखू सोडू शकले नाहीत. त्यांना झालेल्या कॅन्सरची लक्षणे वेळेत कळलीच नाहीत. अन्यथा आबा वाचले असते, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ रविवारी अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथे करण्यात आला.
पुणे आणि मुंबईमध्ये हुक्का पार्लरची संस्कृती निर्माण होत आहे. हल्ली तरुण मुली मोठ्या प्रमाणात सिगारेट अथवा इतर व्यसने करत आहेत. तंबाखूसारख्या व्यसनांमुळे कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे. वैद्यकीय संशोधनामुळे आता कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये बरा होतो. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर कॅन्सरवर मात केली. पण सगळ्याकडे अशी इच्छाशक्ती नसते, असेही अजित पवार पुढे म्हणाले.
शिवसृष्टीबाबत शासनाकडून फसवणूक-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पुण्यातील कोथरुड येथील बीडीपीच्या जागेत महापालिकेकडून शिवसृष्टी तयार करण्यास मंजुरी दिली होती. तरीही शासनाने खासगी ट्रस्टच्या माध्यमातून आंबेगाव येथे उभारण्यात येणाºया शिवसृष्टीला तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. ही सरकारची दुटप्पी भूमिका असून, शासन पुणेकरांची फसवणूक करत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली लाल महालावर अस्मिता परिषदेचा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपप्रसंगी ते
बोलत होते.