युतीचे घोडे अडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 05:15 AM2017-02-28T05:15:54+5:302017-02-28T05:15:54+5:30

मुंबईत भाजपा-शिवसेनेने एकत्र यावे, अशी भावना भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली असली, तरी शिवसेनेने मात्र, ताठर भूमिका कायम ठेवत भाजपाला लक्ष्य केले

All the horses are untouched | युतीचे घोडे अडलेलेच

युतीचे घोडे अडलेलेच

Next


मुंबई : मुंबईत भाजपा-शिवसेनेने एकत्र यावे, अशी भावना भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली असली, तरी शिवसेनेने मात्र, ताठर भूमिका कायम ठेवत भाजपाला लक्ष्य केले आहे. ‘भाजपापेक्षा काँग्रेस परवडली’ असे मत व्यक्त करीत काँग्रेसशी युतीचा पर्याय खुला असल्याचे संकेत शिवसेनेने दिले. त्यामुळे युतीचे घोडे अडलेलेच आहे. मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी दिल्लीला जात असून, तेथे ते श्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि भाजपा-शिवसेनेचे मंत्री हे मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी एकत्र येण्याची शक्यता होती, पण उद्या बैठकच नसल्याचे सांगण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापाठोपाठ सार्वजनिक बाांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा भाजपा-शिवसेना एकत्र येतील, अशी आशा व्यक्त केली. कोणतीही अभद्र युती होणार नाही, असे सांगत, त्यांनी भाजपा सत्तास्थापनेसाठी काँग्रेस वा राष्ट्रवादीची मदत घेणार नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेकडूनही अभद्र युतीची अपेक्षा नसल्याचे मतही व्यक्त केले. मात्र, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईत महापौर भाजपाचाच असेल, दुसऱ्या कुणाचाही नसेल, असे सांगत शिवसेनेला आव्हान दिले. (विशेष प्रतिनिधी)
>मुख्यमंत्र्यांच्या विधानाची शिवसेनेकडून खिल्ली
‘भाजपा मुंबईत काँग्रेससोबत जाणार नाही’ या मुख्यमंत्र्यांच्या विधानाची शिवसेनेने मुखपत्रातून खिल्ली उडविली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची काँग्रेस केली आहे त्याचे काय? त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपाची सध्या झालेली काँग्रेस ही महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार, हा प्रश्नच असल्याचे शिवसेनने म्हटले आहे. फडणवीस सरकार अद्याप नोटीस पीरियडवर असल्याचे खा. संजय राऊत हेही म्हणाले.
>मनसे शिवसेनेसोबत!
मुंबईत मनसेची भूमिका मराठी माणसाच्या हिताचीच असेल. अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील, असे मनसेचे
नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
त्यांच्या विधानातून मनसेचा पाठिंबा शिवसेनेला राहील, असे संकेत मिळाले. राजकारणात कोणीही कुणाचा कायम मित्र वा शत्रू नसतो, असे उद्गारही
त्यांनी काढले.
>सेना स्वत:हून बाहेर पडणार नाही : राणे
शिवसेना विरोधकांबरोबर असल्याशिवाय फडणवीस सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणे शक्य नाही. त्यामुळे काय ते शिवसेनेने ठरवावे. धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली.
>महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक
शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज महापालिकेच्या मावळत्या महासभेत मंजूर करण्यात आला़ सत्तास्थापनेचा निर्णय अधांतरी असल्याने शिवसेनेने हा प्रस्ताव तातडीने मंजूर केला़ त्यामुळे महापौरांचे नवीन निवासस्थान भायखळ्यातील राणीच्या बागेत हलविण्यात येण्याची शक्यता आहे़
>असे असेल महापौरांचे नवीन निवासस्थान
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील नवीन बंगला सहा हजार चौरस फुटांचा आहे़ गेल्या दीड वर्षांपासून हा बंगला रिकामा असून, नुकतीच त्याची डागडुजी करण्यात आली आहे़ त्यामुळे हा बंगला महापौर निवासस्थानासाठी देण्याचा विचार सुरू आहे़ मात्र, याबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही़

Web Title: All the horses are untouched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.