मुंबई :महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात कोरोनाची स्थिती अद्यापही गंभीर असलेली पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळहूनमहाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आता कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना उद्धव ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. (all incoming passengers from kerala to maharashtra will have to present RT-PCR negative test)
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. तत्पूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती.
कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, केरळहून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी हा आदेश बंधनकारक आहे.
दिलासादायक! आठवडाभरात ६०० जिल्ह्यांत एकही कोरोना मृत्यू नाही; नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल
प्रवाशांना हवाई मार्गाने महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी ७२ तास आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. विमानात बसण्याची परवानगी देण्यापूर्वी प्रवाशांचे कोरोना चाचणी अहवाल तपासावेत, अशी विमानतळ प्राधिकरणाला विनंती करण्यात आली आहे. तर, रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना ९६ तास आधीचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही राज्यातील १० जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, तिरुवनंतपूरम, कोझिकोड, कोल्लाम आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे.