पुणे : विदर्भात जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट पहात असलेल्या मराठवाड्याला गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सूनने दिलासा दिला आहे. येत्या २४ तासात कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील भिरा ८०, अलिबाग ७०, माथेरान, पेण ६०, खालापूर, रोहा, सांगे ५०, कर्जत, लांजा, मंडणगड, राजापूर, वैभववाडी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर ६०, गगनबावडा, राधानगरी ५०, चंदगड, इगतपुरी ४०, पौड मुळशी, पेठ, शाहूवाडी ३० मिमी पाऊस पडला.मराठवाड्यात अर्धापूर, धर्माबाद, मुदखेड, उमरी ७०, बिल्लोरी ५०, नायगाव, खैरगाव ४० मिमी पाऊस झाला. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. विदर्भात मूलचेरा १६०, भामरागड १३०, उमरेड ७०, अहिरी, सिरोंचा ५०, अकोला, भिवापूर, चामोर्शी, चंद्रपूर, धनोरा, इटापल्ली ४० मिमी पावसांची नोंद झाली. घाटमाथ्यावरील दावडी, शिरगाव १३०, कोयना, १२०, डुंगरवाडी १००, ताम्हिणी ९०, अम्बोणे ८०, लोणावळा, वळवण ६० मिमी पाऊस झाला.सध्या मॉन्सून ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि छत्तीसगड या परिसरात सक्रीय आहे. २१ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ आॅगस्ट रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात सर्वदूर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:19 AM