नागपूर : गेले काही दिवस स्वपक्षावर नाराज असलेले भंडारा-गोंदियाचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करून खळबळ उडवून दिली. केंद्रातील सर्व मंत्री मोदींच्या दहशतीत आहेत, असा थेट आरोप करत माझ्या वक्तव्याची कशी दखल घेतली जाईल मला माहीत आहे. पण मी आता घाबरत नाही, अशी आरपारची भाषा त्यांनी केल्याने संघभूमीत अस्वस्थता पसरली.‘विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकºयांचे अश्रू’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना खा. पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदींनी एकदा सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. त्यात मी शेतीच्या वाईट अवस्थेची माहिती दिली तर मोदी माझ्यावरच भडकले. त्यांना विरोधात ऐकण्याची सवय नाही.खा. पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, महाराष्टÑाच्या राज्यकर्त्यांची मला कीव येते. येथे सिंचन प्रकल्प पैशांअभावी अडकून पडले आहेत. हे चित्र बदलण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्र सरकारला खासदारांची किंमत नाही. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. अर्थसंकल्पाच्या आधी मी केंद्राच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांकडे विषय उपस्थित केला तर त्यांनी खासदारांची बैठक बोलावणेच बंद करून टाकले. मुख्यमंत्री विदर्भाचा असो की पश्चिम महाराष्ट्रातील, मुख्यमंत्री झाला की बदलतो ही वास्तविकता आहे. इथे मीडिया उपस्थित आहे. माझ्या वक्तव्याची कशी दखल घेतली जाईल मला माहीत आहे. पण, मी आता घाबरत नाही. एक खासदार म्हणून दिल्लीतून बघितल्यावर महाराष्ट्र मला भिकारी दिसतो. मी स्वत: शेतकरी आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मी नेहमी भांडत राहील. इंग्लंडसारखा देश शेतीत ८० टक्के भागीदारी करतो तर भारतासारख्या कृषिप्रधान देशाला असे करण्यात काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.फुकेंची झाली अडचणया कार्यक्रमात भंडारा-गोंदियातील आ. परिणय फुके हेसुद्धा उपस्थित होेते. खा. पटोले केंद्र व राज्य सरकारवर असा थेट हल्लाबोल करीत असताना ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. स्वत:च्याच पक्षश्रेष्ठींवर अशी जहरी टीका योग्य नाही. पटोलेंनी जरा आवरते घ्यावे म्हणून ते त्यांना इशारेही करीत होते. पटोले मात्र आरपारच्या मूडमध्ये होते. त्यांनी सरकारच्या धोरणांविरुद्ध शाब्दिक प्रहार सुरूच ठेवले. पटोले थांबण्याची चिन्हे दिसत नसल्यानेआ. फुके यांच्या चेहºयावरचे रंग पार बदलून गेले होते.
केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीत, भाजपा खासदाराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 5:19 AM