पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात विविध मराठा संघटनांनी आक्रमक पावित्रा स्वीकारत राज्य सरकारवर हल्लाबोल सुरु केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी म्हणून ठाकरे सरकारने EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, सरकारच्या या निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, अशी घणाघाती टीका मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. या पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, राष्ट्र सेवा समूहाचे राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर,मराठा महासंघाचे अनिल मारणे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या शशिकला भोसेकर, श्रीमंत कोकाटे, उत्तम कामठे उपस्थित होते.
मराठा समाजाने आम्हाला 'ईडब्ल्यूएस'आरक्षण द्या अशी कधीही मागणी केली नव्हती. पण सरकारने हे आरक्षण देऊन आमच्यासाठी व्यापक स्वरूपात व अधिकृतरित्या मिळणाऱ्या आरक्षणाचाच खून करण्याचे काम केले आहे. याद्वारे संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक आघाडी सरकारने केली आहे, यात महत्वपूर्ण बाब म्हणजे आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या ४२ तरुणांचा अपमान या आघाडी सरकारने केला आहे, अशी संतप्त भूमिका मराठा समाजाच्या नेत्यांनी पुण्यात मांडली आहे.
'तो' निर्णय रद्द करा, अन्यथा...; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा ठाकरे सरकारला इशारामराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून दूर लोटणारा असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाचा या निर्णयाला विरोध असून शासनानं आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे.