Rajesh Tope: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या; राजेश टोपे यांची केंद्र सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 05:26 AM2021-04-18T05:26:11+5:302021-04-18T05:26:20+5:30
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील माहिती देताना टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिविर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या. ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेने करण्याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रकाशित केले होते.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील माहिती देताना टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली. रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधि व न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूची जनुकीय संरचना बदलली का, याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यातील १,१०० पैकी ५०० नमुन्यांची तपासणी झाली असून, सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडून लवकरच दिला जाणार आहे. सर्वांत जास्त संसर्ग करण्याची क्षमता या विषाणूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत टोपे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
nऑक्सिजन घेऊन येणारी वाहने अडवली जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
nरस्तेमार्गे कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतूक करण्यात यावी.
nहवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचे जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत.
nरेमडेसिविरचा जो साठा शिल्लक आहे, त्यातील जास्तीत जास्त महाराष्ट्राला मिळावा.