- राजा मानेमुंबई : महाआघाडी मूलभूत विचारसरणीच्या आधारावर उभी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे का, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत स्थान नसेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागा वाटप, देशातील राजकारण, मोदी सरकार, अर्थसंकल्प, अण्णा हजारेंचे उपोषण आदी विषयांवर खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी सविस्तर बातचित केली. जागा वाटपाबाबत अजित पवारांसोबत चर्चा झाली, त्यानुसार जी जागा त्यांना सोयीची वाटते ती त्यांनी घेतली पाहिजे, जी आम्हाला सोयीची आहे ती आम्ही घेतली पाहिजे. याबाबत अंतिम चर्चा बाकी असून मी ठेवलेला प्रस्ताव त्यांनाही मान्य आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आम्ही नुकतेच भेटलो. त्यांनी १२ जागा मागितल्या आहेत. एवढ्या जागा देणे शक्य नाही. पण आम्ही योग्य जागा सोडू. शिवाय, सीपीआय, सीपीएम, राजू शेट्टी, कवाडे यांची आरपीआय यांसारख्या ७-८ पक्षांशी आमची बोलणी झाली आहे. संभाजी ब्रिगेडची काँग्रेसला पाठिंबा देण्याची इच्छा आहे. त्यांनाही सोबत घेऊ. जागावाटप करताना समजा ८ जागा, आम्ही इतर पक्षांना दिल्या, तर त्यापैकी ४ जागा राष्ट्रवादी देईल व ४ जागा आम्ही देऊ. जागा वाटपात घटक पक्षांना समान न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या निवडणुकीत ७० टक्के मते भाजप-सेनेच्या विरोधात राहिली आहेत. केवळ ३० टक्के मतांवर भाजपा-सेनेचं सरकार आलं. त्यामुळे सर्वच समविचारी पक्षांना आघाडीत घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राज्यात काँग्रेस आघाडीला पोषक वातावरण आहे. जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून मी गेल्या ६ महिन्यांमध्ये सर्वच जिल्ह्यात फिरलोय. काँग्रेसला पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.ही तर शेतकऱ्यांची थट्टाच!अल्पभूधारक शेतकºयांना वार्षिक सह हजार रुपये अनुदान केंद्र सरकार देणार आहे. दिवसाला १७ रुपये देणे ही शेतकºयांची थट्टाच आहे. किमान आधारभूत किंमतीवर राज्य सरकारकडून शेतमाल खरेदी केला जाईल, असे आश्वासन भाजपाने दिले होते. त्याचे काय झाले? कर्जमाफीचे पैसे अद्याप शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.
महाआघाडीत आंबेडकरांचे स्वागत, मनसेला स्थान नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:51 AM