अंबरनाथ : दफनविधीसाठी महिलेच्या मृतदेहाला 20 तास करावी लागली प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 08:57 PM2018-03-08T20:57:17+5:302018-03-08T20:57:17+5:30
एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला.
अंबरनाथ : उल्हासनगरमध्ये मुस्लीम धर्मियांची दफनभूमी नसल्याने या शहरातील मुस्लीम बांधवांना दफनविधीसाठी इतर शहरांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. असाचा प्रकार काल एका महिलेच्या बाबतीत घडला. एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला. तब्बल २० तास या विषयावर चर्चा केल्यावर अंबरनाथमध्येच त्या महिलेला दफन करण्यात आले. मात्र या पुढे उल्हासनगरमधील मुस्लीम धर्मियांचा दफनविधी अंबरनाथमध्ये करू दिला जाणार नाही अशी ठाम भूमीका अंबरनाथ मुस्लीम जमातीने घेतली आहे.
उल्हासनगर महानगर पालिकेत दफनभूमी नसल्याने या ठिकाणी राहणा-या मुस्लीम बांधवांची मोठी गैरसोय होत आहे. मृत व्यक्तींना दफन करणार कोठे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेकवेळा दफनभूमीच्या नावावर संघर्ष देखील निर्माण झाला आहे. असाच संघर्ष पुन्हा एकदा निर्माण झाला. मात्र, हा संघर्ष उल्हासनगरमध्ये घडला नसून अंबरनाथमध्ये घडला आहे. उल्हासनगरमधील मुस्लीम महिला सईद युन्नीसा खान या महिलेचा मृत्यू बुधवारी झाला होता. उल्हासनगरमध्ये दफनभूमी नसल्याने हे प्रेत थेट अंबरनाथच्या कब्रस्थानमध्ये आणण्यात आला. मात्र अंबरनाथमधील दफनभूमी ही अंबरनाथकरांनाच अपुरी पडत आहे. जागा अपुरी असल्याने इतर शहरातील मृत्य व्यक्तींना दफन करणो शक्य होत नाही. येवढेच नव्हे तर दफन केलेल्या जागेवर वर्षभरातच पुन्हा दुसरे प्रेत दफन करण्याची वेळ आली आहे. आधी दफन गेलेले प्रेत पूर्णपणो विघटित होत नसल्याने दुसरे प्रेत दफन करण्यासाठी खड्डा खोदल्यावर अर्थवट विहटीत झालेले प्रेत निघतात. त्यामुळे अंबरनाथ मुस्लीम जमातीने बाहेरील शहरातील मृतदेह अंबरनाथमध्ये दफन करु दिले जाणार नाही अशी भूमीका घेतली आहे. ही भूमीका घेतल्यावर लागलीच बुधवारी उल्हासनगरमधील एका महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेला थेट दफनविधीसाठी अंबरनाथच्या दफनभूमीत आणन्यात आले. मात्र तेथे परवानगी न मिळाल्याने हा मृतदेह दफनविधीसाठी तब्बल 20 तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्तांना या प्रकरणात हस्तक्षेप करित महिला दिनाचे कारण पुढे करित या महिलेला दफन करण्याची विनंती केली. महिला दिन असल्याने अंबरनाथ मुस्लीम जमातीने देखील या महिलेला अंबरनाथमध्ये दफन करण्याची परवानगी दिली आहे. २० तासानंतर त्या महिलेला दफन करण्यात आले.
या संदर्भात मुस्लीम जमातीचे प्रमुख सलिम चौधरी यांनी सांगितले की अंबरनाथमध्ये आधीच जागा नाही. ही जागा अंबरनाथकरांनाच कमी पडत आहे. त्यामुळे बाहेरील मृतदेह या ठिकाणी दफन करणो शक्य नाही. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला आहे.