पुणे : आचारसंहितेच्या काळात एका खासगी टीव्ही वाहिनीवरील मालिकेमुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार होत आहे. त्यामुळे ही मालिका बंद करावी, अशा आशयाची तक्रार आंबेगाव येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे.पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, आचार संहितेच्या नवीन निमयावलीनुसार एखादा अभिनेता निवडणूक लढवत असल्यास त्याची मालिका खासगी टीव्ही वाहिनीवर सुरू असेल तर ती थांबवता येणार नाही. मात्र, दूरदर्शनसारख्या शासकीय वाहिन्यांवर अभिनेता असलेल्या उमेदवारांच्या मालिका दाखवता येणार नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही त्यांची मालिका आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार थांबवता येणार नाही.दरम्यान, अमोल कोल्हे यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यांची उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांच्याबाबत कोणती तक्रार आल्यास संबंधित तक्रारीचे स्वरूप पाहून त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.
अमोल कोल्हे यांची टीव्ही मालिका सुरूच राहणार, निवडणूक आयोगाने फेटाळली याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:05 AM