मुंबई: गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसेवरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. काल मुंबईतील सभेत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हनुमान चालिसेच्या दोन ओळी वाचत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार टोला लगावला आहे.
अमोल मिटकरी यांनी एका ट्विटमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी भाषणात उल्लेख केलेल्या ओळींचा चुकीचा अर्थ सांगितल्याचा दावा मिटकरींनी केला आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाचा कर्कश भोंगा ऐकला. त्या भोंग्यामधून हनुमान चालीसामधील चौपाईचा आधार घेत "पैसा" असा उल्लेख आला. रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजपाच्या या भरीव नेत्यांनी 'राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पईसारे' याचा खरा अर्थ अगोदर समजून घ्यावा," असा टोला मिटकरींनी लगावला.
काय म्हणाले होते फडणवीस?रविवारी झालेल्या भाजपच्या सभेत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. "हनुमान चालीसामधील दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला आधीपासून माहित आहे. ते फक्त त्याच दोन ओळींवर काम करत आहेत. काय आहेत या दोन ओळी तर, 'राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे'.. म्हणून फक्त 24 महिन्यात 53 मालमत्ता तयार झाली आणि यशवंत जाधव यांनी आपल्या मातोश्रीला 50 लाखांची घड्याळही दिली," अशी टीका फडणवीसांनी केली होती.
मुख्यमंत्र्यांची लाफ्टर सभा"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा आहे. आम्हाला भाषणात नवे मुद्दे येतील अशी आशा होती, परंतु शेवटपर्यंत लाफ्टर सभा होती. तेजस्वी ऐकायला मिळेल असा आम्हला काल वाटलं होतं, नवं काहीच ऐकायला मिळल नाही. कालची कौरवांची सभा झाली, आज पांडवांची सभा," असं फडणवीस म्हणाले होते.