भाजपाने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा असलेली अमरावतीची जागा नवनीत राणांना देत एकाचवेळी दोन मित्रपक्षांना धक्का दिला आहे. शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडूंनी प्रहार पक्ष राणांचा प्रचार करणार नाही, अशी घोषणाच करून टाकली आहे. अशातच मागे आड, पुढे विहीर अशा चिंतेत सापडलेल्या एकनाथ शिंदेंना आणखी एका महत्वाच्या जागेचा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री आणि एकेकाळचे सहकारी नारायण राणे यांच्यासाठी शिंदेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ सोडावा लागणार आहे. शिंदे यांचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेवरून लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी जोरदार तयारीही गेली काही वर्षे केली होती. निलेश राणेंना उमेदवारी मिळणार या शक्यतेने त्यांनी दोनदा व्हॉट्सअप स्टेटस ठेवून ठाकरे गटाचाही पर्याय असल्याचे जाहीर केले होते.
या जागेचा तिढा सुटल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत आणि नारायण राणे यांच्यात चर्चा झाली होती. त्यात तोडगा निघाला नव्हता. परंतु, अखेर आता पुन्हा झालेल्या चर्चेत ही जागा भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेकडून मिळविल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक या जागा अदलाबदलीच्या असल्याने त्यावर अद्याप चर्चा सुरु आहे.
नारायणा राणेंनी विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर पुन्हा निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली होती, त्यानंतरही त्यांनी मुंबईत पोटनिवडणूक लढविली होती. यानंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेकडे होता. सुरेश प्रभूंनंतर काँग्रेसवासी झालेल्या नारायण राणेंचे सुपूत्र २००९ मध्ये निवडून आले होते. परंतु, २०१४, २०१९ मध्ये त्यांचा पराभव करत शिवसेनेने पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. २०२४ ला देखील निलेश राणेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. यामुळे नारायण राणेंना भाजपा उमेदवारी देणार आहे. राणेंना राज्यसभेला संधी देण्यात आलेली नाही. यामुळे त्यांना लोकसभेवर पाठविण्याचे भाजपाची योजना आहे. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत.