मालेगाव - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव इथं जाहीर सभा होत असून या सभेतून ते कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकीकडे उर्दू भाषेतील पोस्टर शहरात लावण्यात आलेत तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या विधानाचा उल्लेख करत लोकांना भावनिक आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
मालेगावच्या सभेसाठी शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या सभेला उत्तर महाराष्ट्रातून शिवसैनिक हजेरी लावतील असं सांगण्यात येत आहे. सभेच्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या महात्मा फुले चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात केलेल्या विधानाचा उल्लेख करण्यात आला आहे. जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा... असं भावनिक आवाहन ठाकरे गटाकडून लोकांना करण्यात येत आहे.
या बॅनरवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. या फोटोतून भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. बाळासाहेबांनी दोन्ही हात उभे केलेला फोटो लावण्यात आला आहे. एकनाथ शिंदे आणि ४० आमदार फुटल्यानंतर खरेतर उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी ही पहिलीच सभा आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते, आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत गेले आहेत. त्यात दादा भुसे, गुलाबराव पाटील, सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे यांचा समावेश आहे. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सभेपूर्वीच महिला पदाधिकाऱ्यांचा 'जय महाराष्ट्र'मालेगावातील उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी नाशिक येथील महिला पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. उपऱ्या शिवसैनिकांना खरी शिवसेना माहिती नाही. महिला आघाडीत राहून आमच्यावर शिंतोडे टाकून घ्यायचे नाहीत. त्यामुळे महिला आघाडीच्या ३ जिल्हा संघटक, २ शहर प्रमुख, ३ उपजिल्हाप्रमुख यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.