राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गट राजी
By admin | Published: November 3, 2016 05:30 AM2016-11-03T05:30:22+5:302016-11-03T05:30:22+5:30
श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहे
अलिबाग : श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी प्रमुख इच्छुक दावेदार असताना नगराध्यक्षपदाचा व नगरसेवकपदाचे उमेदवार निवडण्याचा सर्व अधिकार श्रीवर्धन तालुका, शहर कार्यकारिणी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांना दिले होते.
नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना पुन्हा संधी देत त्यांचा या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यानंतर प्रमुख अन्य इच्छुक दावेदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. मात्र, आमदार सुनील तटकरे यांनी नाराज दावेदारांशी चर्चा केल्यावर सर्व नाराजांनी श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत एकदिलाने काम करण्याची ग्वाही तटकरे यांना दिल्याने येथील कार्यकर्ते कामास लागले आहेत.
श्रीवर्धन नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना पुन्हा संधी देत, त्यांचा या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यानंतर रा.काँ. तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, शहरअध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अबू राऊत, नरेंद्र भुसाणे या नाराज इच्छुकांबाबत निवडणुकीत पक्षाचे काम न करण्यासह पक्ष सोडण्याच्या बातम्या झळकल्या लागल्या होत्या. यामुळे श्रीवर्धन तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला होता. आमदार सुनील तटकरे यांनी या प्रमुख इच्छुक नाराज मंडळींची श्रीवर्धन येथे जाऊन भेट घेतली व नाराज मंडळींनी पक्षात सक्रि य राहून एकदिलाने काम करून श्रीवर्धन नगरपालिकेत पुन्हा नगराध्यक्षासह आघाडीची निर्विवाद सत्ता आणण्याचे वचन दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे तोलामोलाचे अनेक कार्यकर्ते उमेदवारीस पात्र आहेत, पण सर्व बाबींचा सारसार विचार करून नगराध्यक्षपदासाठी पक्षाच्या वतीने नरेंद्र भुसाणे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या अनेकांना नाराज व्हावे लागले याचे दु:ख निश्चितच आहे. पण दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक, डॉ.अबू राऊत यांनी नाराजी दूर करून एकदिलाने काम करण्याचा निश्चय केल्याने यांच्या त्यागाची दखल सुनील तटकरे म्हणून नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रदेशपातळीवर घेईन, असे आ.तटकरे यांनी यावेळी बोलताना दिले आहे. (विशेष प्रतिनिधी)