मुंबई : माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद घेतले. दरम्यान, गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Anil Deshmukh's tweet after Dilip Walse-Patil took over as Home Minister)
अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "आज माझे स्नेही दिलीपराव वळसे पाटीलजी यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!," असे अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, दिलीप वळसे-पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिलीप-वळसे पाटील यांनी सध्याचा काळ कठीण असून प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. यासोबतच, त्यांनी राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या प्रश्नावरही सूचक विधान केले आहे.
'कडक शिस्तीचे प्रशासक...', जयंत पाटलांनी जुना फोटो शेअर करत नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा!राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबतचा युवक कारकिर्दीतील फोटो शेअर करुन अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "माझे जुने मित्र नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त... कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा!" असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणारअनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट निलंबित API सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या आरोपांची चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने परमबीर सिंग प्रकरणी दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निकालाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची महत्वाची माहिती देखील यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. यासोबतच कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एएनआय असो सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले. काय आहे प्रकरण?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. याप्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टाने अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआयला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.