अण्णा हजारे यांना भेटण्यास मनाई; प्रकृती खालावली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:20 AM2019-02-14T01:20:45+5:302019-02-14T01:20:56+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सात दिवसांच्या उपोषणात खालावलेली प्रकृती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सात दिवसांच्या उपोषणात खालावलेली प्रकृती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गावात धार्मिक सप्ताह सुरू असल्याने रुग्णालयात दाखल होण्यास अण्णांनी नकार दिला आहे.
जनलोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत सात दिवस राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते. या उपोषणामुळे हजारे यांचे चार किलोंनी वजन घटले होते. ते सध्या दररोजच्या जेवणात पातळ पदार्थ घेत होते. प्रकृती पूर्वपदावर येईपर्यंत संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्लाही त्यांना डॉक्टरांनी दिला होता. उपोषण सुटल्यानंतर राज्यभरातील अभ्यागत अण्णांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीत येत आहेत. अभ्यागतांशी बोलावे लागत असल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. बुधवारी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांची दोनवेळा तपासणी केली. अण्णांना संपूर्ण विश्रांतीची गरज असून त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
राळेगणसिद्धीत सध्या धार्मिक सप्ताह सुरू असल्याने रुग्णालयात दाखल होण्यास अण्णांनी नकार दिला आहे. दरम्यान अण्णांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. त्यांना कोणीही भेटण्यास येऊ नये, असे आवाहन त्यांच्या कार्यालयाने केले आहे.