करकरेंच्या तपासातील निष्कर्ष जाहीर करा
By admin | Published: May 17, 2016 05:53 AM2016-05-17T05:53:03+5:302016-05-17T05:53:03+5:30
तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत
मुंबई : तत्कालीन एटीएस प्रमुख
हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारने अनेक तथ्य जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. हेमंत करकरे हयात असताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासावर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतले होते. त्यासंदर्भात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनमोहन सिंग यांनी वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांसह तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना अडवाणींच्या निवासस्थानी पाठवून या चौकशीत समोर आलेल्या गंभीर बाबी अवगत केल्या होत्या. वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे अडवाणी यासंदर्भात एका शब्दानेही कधी बोलले नाहीत, याकडे मोहन प्रकाश यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. आज करकरेंच्या तपासावर अयोग्य आक्षेप घेतले जात असताना अडवाणींनी मौन न बाळगता त्या वेळी त्यांच्यासमोर कोणते तथ्य आले होते, ते जाहीर करावे अशी अपेक्षा मोहन प्रकाश यांनी व्यक्त केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची माहिती देण्यासाठी करकरे यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. एवढेच नव्हे, तर संबंधित संघटनेकडून सरसंघचालक भागवत यांच्या जिवालाही धोका असल्याचे करकरे यांनी या भेटीमध्ये सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सरसंघचालकांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. भागवतांनी त्यांची करकरेंशी भेट झाली होती की नाही, ते जाहीर केले पाहिजे, अशीही मागणी मोहन प्रकाश यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)