मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र, यावर अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाची आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली. यावेळी सरकारने येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मोर्चे, आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे-पाटील, महेश राणे उपस्थित होते.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी जाळपोळ आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. मराठा आंदोलनात आतापर्यंत पाच जणांना आत्महत्या करून जीवन यांत्रा संपवली. औरंगाबादमध्ये कायगाव टोका याठिकाणी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला चाकण, नांदेड, नवी मुंबईत हिंसक वळण मिळाले होते.
(सविस्तर वृत्त लवकरच...)