गोव्यात एड्समुळे वार्षिक सरासरी 37 बळी
By admin | Published: August 27, 2016 01:34 PM2016-08-27T13:34:28+5:302016-08-27T13:34:28+5:30
गोव्यात एड्समुळे वर्षाला सरासरी 37 लोकांचा मृत्यू होतो.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २७ - राज्यात एड्समुळे वर्षाला सरासरी 37 लोकांचा मृत्यू होतो. राज्यात 1989 साली पहिला रुग्ण गोव्यात सापडला होता. गेल्या 29 वर्षात एड्समुळे सरासरी 1094 रुग्ण मृत्यू पावले आहेत. तर महिन्याला 3 रुग्णांचे मृत्यू एड्समुळे होतात. गेल्या सहा वर्षापासून राज्यात एड्च्या रुग्ण नोंदणीची संख्या कमी होत चालली आहे.
गोवा राज्य एडस नियंत्रण संस्थेला 1987 साली पहिला विदेशी नागरिक रुग्ण आढळला होता. त्यानंतर 1988 साली एक भारतीय रुग्ण मात्र तो गोमंतकीय नव्हता असा रुग्ण सापडला होता. राज्यात 1987 ते 2016 र्पयत 16 हजार 201 एडस बधित आणि एचआयव्हीग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर मे 2016 र्पयत 1 हजार 706 रुग्ण एडसबाधित आढळले आहेत.
राज्यातील काही तालुक्यांमध्ये एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. यात चार समुद्रकिनारी भागातील तालुक्यांची नोंद आहे. 2015 सालात सालसेत (9.7 टक्के), वास्को (22.2 टक्के), तिसवाडी (8.5 टक्के), बार्देश (11.9 टक्के) एचआयव्हीग्रस्त रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर 2015 साली एकूण 26.8 टक्के एचआयव्हीग्रस्तांची नोंदणी झाली असून यात राज्य, विदेश व इतर भागातील लोकांचा समावेश आहे.
2015 सालात 15 ते 49 वयोगटातील 80.6 टक्के लोक एचआयव्हीग्रस्त आढळले आहेत. यात 31.2 टक्के महिलांचा समावेश आहे. महिलांचा वयोगट 15 ते 34 आढळतो. तर 36.7 टक्के पुरुष एचआयव्हीग्रस्त आढळले.
वयोगट 35 ते 49 या वयातील 43.1 टक्के पुरुषांना एचआयव्हीची लागण झाली आहे. तर 50.4 टक्के महिला या वयोगटातील आहेत. 2011 साली एचआयव्हीचीग्रस्त रुग्णांची संख्या 106 होती. मात्र त्यानंतर दरवर्षी ही संख्या कमी होत गेलेली दिसते. 2015 साली एकूण 29 रुग्ण एचआयव्हीग्रस्त आढळले. तर 2016 जानेवारी ते मे महिन्यार्पयत 12 रुग्ण एचआयव्हीग्रस्त आढळले असल्याचा गोवा राज्य एडस नियंत्रण संस्थेच्या अहवालात स्पष्ट केले आहे.
राज्यात 2015-16 या कालावधीत धारबांदोडा तालुक्यात एकही एचआयव्हीग्रस्त रुग्ण सापडला नाही. तर पेडणो, केपे आणि काणकोण तालुक्यात 1.8 रुग्ण 2016 साली आढळले. डिचोली तालुक्यात 2.4 तर सत्तरी 0.6, फोंडा येथे 3.0 टक्के रुग्ण आढळले.
(प्रतिनिधी)