रत्नागिरी : जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या प्रकल्पांना लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करून तशाच प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करावेत. कोकणाला लाभलेला समुद्र किनारा तसेच बंदरांचा होणारा विकास यासाठी चेन्नईच्या मेरिटाईम विद्यापीठाचे दुसरे केंद्र रत्नागिरीत सुरू करण्याची घोषणा रस्ते वाहतूक महामार्ग व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचा कोनशिला समारंभ रस्ते वाहतूक महामार्ग व जहाज बांधणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिंदल इन्फ्रास्ट्रक्चरचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बी.व्ही. जे. के.शर्मा, आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंबकल्याण केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनायक राऊत, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, संस्थेचे उपाध्यक्ष बाळ माने व डॉ. मुकुंद पानवलकर, कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, उपकार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव अॅड. प्राची जोशी, सहसचिव नाना पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, जिंदलचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, उद्योजक विजय देसाई, माधुरी लोकापुरे आदी उपस्थित होते.भारतात शिक्षण व परिवार पध्दतीमुळे मूल्याधिष्ठीत, सुसंस्कारित पिढी घडत आहे. परंतु सध्या शिक्षणाचे झालेले व्यापारीकरण लक्षात घेता विद्यार्थ्यांकडून डोनेशन न घेण्याची सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली. व्यवसायाभिमुख, तांत्रिक, रोजगाराभिमुख शिक्षणक्रम सुरू करावेत. कोकणातील मंडळींनी स्वत:ची मानसिकता बदलवी. येत्या डिसेंबरअखेर ३५० टोलनाके ‘ई’ टोलनाके करण्यात येणार आहेत. जिंदालने १.३ कोटीची मदत या इमारत बांधकामासाठी घोषित केली आहे ती २ कोटी करावी असे आपण त्यांना सांगितल्याचे गडकरी म्हणाले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालयीन कार्याचा आढावा घेतला. जिंदल इन्फ्रास्ट्रक्चरचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बी. व्ही. जे. के.शर्मा यांनी ‘सागरमाला’मध्ये जयगड व रत्नागिरी यांचा समावेश करावा, अशी मागणी केली. संस्थेच्या सचिव अॅड. प्राची जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘रत्नागिरीत मेरिटाईम विद्यापीठाचे दुसरे केंद्र होणार’
By admin | Published: December 12, 2014 10:37 PM