'केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवली जातात'; अमोल कोल्हेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 07:13 PM2023-12-29T19:13:44+5:302023-12-29T19:14:28+5:30
शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते.
टोमॅटोला भाव मिळायची संधी मिळाली तर मोदी सरकारने नेपाळमधून टोमॅटो निर्यात केला. कापसाला भाव मिळण्याची संधी मिळाली तर मोदी सरकारने ऑस्ट्रेलियामधून कापूस निर्यात केला, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली.
मोदी सरकारने तूर आणि उडीद आयात करण्याचे धोरण आणखीन लांबवले जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याचा घामाचा मोल मिळणार नाही अशा पद्धतीने ही शेतकरी विरोधी धोरणे ही सातत्याने केंद्रातल्या भाजप सरकारकडून राबवली जातात, असा निशाणा अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारवर साधला. शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते.
खासदार सुप्रिया सुळेंनी देखील यावेळी भाजपावर टीका केली. ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सचा वापर करून लोकांची घरं व पक्ष फोडायचे पण कांद्याला आणि दुधाला भाव द्यायचे नाही. फक्त पोस्टरबाजी करायची हे भारतीय जनता पार्टी म्हणजेच भ्रष्ट जुमला पार्टीचे काम आहे. शेतकऱ्यांबद्दल काहीच त्यांच्या बॅनरवर दिसत नाही, त्यांच्या पोस्टरबाजीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाही. त्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात आपली लढाई आहे, वैयक्तिक आमचा कुणाशीही काहीच संबंध नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
...आम्हाला तेव्हा सभागृहातून बाहेर काढले-
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हे आणि मी मंत्र्यांची भेट घेतली, पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही. म्हणून आम्ही पार्लमेंटमध्ये कांदा घेऊन गेलो, आम्ही काहीही बोललो नाही, निदर्शने, घोषणा असे काही केले नाही. आम्ही सांगितले की, या कांद्यासाठी आम्हाला फक्त दोन मिनिटे बोलायचा वेळ द्या. तेव्हा आम्हाला सांगितले की तुम्ही दोघेही बाहेर जावा, व आम्हाला तिथून बाहेर काढले. सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे करत आहोत, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.