मुंबई:आर्यन खान ड्रग्स प्रकरणात(Aryan Khan Drugs case) रोज नव-नवीन ट्विस्ट येत आहेत. आता आजही क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. एनसीबीच्या(NCB) या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने(Prabhakar Sail ) प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दरम्यान, यावर आता मुंबई एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल करुन अनेक धक्कादायक खुलासे केले. आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुखकडे(Shahrukh Khan) 25 कोटींची मागणी केल्याचा दावा केला आहे. तसेच, यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आता त्याच्या याच आरोपांवर एनसीबीने स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे एनसीबी या आरोपांप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होते, पण पत्रकार परिषद रद्द करुन एनसीबीने प्रसिद्ध पत्रक जारी करत भूमिका मांडली आहे. यामध्ये एनसीबीने साईल यांना कोर्टात आपलं म्हणणं मांडण्याचा सल्ला दिला आहे.
एनसीबीने प्रसिद्धीपत्रात काय म्हटलं ?एनसीबीचे मुंबई प्रदेश उपसंचालक जनरल मुथा अशोक जैन यांनी हे प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, 'आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या न्यायलयात आहे. या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईल यांना काही मत मांडायचं होतं तर त्यांनी सोशल मीडिया ऐवजी न्यायालयात मांडायला हवं होतं. त्यांनी सोशल मीडियावर काही लोकांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडण केलं आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी आणि तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या डायरेक्टरांकडे पाठवत असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल', असं एनीसीबीच्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.