मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आज अजून एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध आहेत. तसेच क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया त्याच्या गर्लफ्रेंडसह उपस्थित होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. खेळ संपला पण खेळाडू अद्याप मोकाट आहे, असे विधानही मलिक यांनी यावेळी केले.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडेंवर जोरदार आरोप करत आहेत. दरम्यान, नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध आहेत. मुंबईत ज्या क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाही होता. तसेच त्याची गर्लफ्रेंडही बंदुकीसह क्रूझवर होती. तो कुठल्या देशाचा नागरिक आहे. त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत, याचा तपास झाला पाहिजे. या क्रूझवर कारवाई करण्यात आली तेव्हा काही मोजक्याच लोकांना पकडण्यात आले. मात्र हजारो लोकांना झाडाझडती न घेता का सोडून देण्यात आहे. सॅम डिसोझा आणि दाढीवाला कोण, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
ज्या क्रूझवर ही पार्टी झाली त्या पार्टीमधील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात यावेत, म्हणजे सरळा पर्दाफाश होईल. तसेच समीर वानखेडेच्या मालदीव दौऱ्याचीही चौकशी व्हायला पाहिजे. त्याबरोबरच समीर वानखेडे, गोसावी आणि प्रभाकर साईल यांचा सीडीआर काढल्यास बरीच माहिती समोर येईल, असा दावाही नवाब मलिक यांनी केला.
एका प्रकरणात वर्षभरापूर्वी एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी झाली. मात्र त्यांना अटक का झाली नाही, असा प्रश्नही नवाब मलिक यांनी उपस्थित केला. तसेच समीर वानखेडे यांचा जन्मदाखला खोटा असल्याचा दावाही मलिक यांनी केला. जर मी दाखवलेला दाखला खोटा असेल, तर खरा दाखला पुढे आणावा, असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले.