साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 07:24 PM2018-10-19T19:24:35+5:302018-10-19T19:25:00+5:30
साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
मुंबई - साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. सरकारने 1 कोटी 25 लाख घरे बांधल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला दावा खोटा आहे, आसा आरोप चव्हाण यांनी केला. तसेच केवळ दहा घरांच्या चाव्या वाटण्यासाठी पाच कोटी रुपयांचा चुराडा केल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
आधीच्या सरकारनं 4 वर्षात 25 लाख घरं बांधली होती. त्याच कालावधीत आम्ही 1 कोटी 25 लाख घरं बांधली आहेत. नियत स्वच्छ असल्यावर काम जलद गतीनं होतात, अशा शब्दांमध्ये विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन 2019चा नारळ फोडला होता. आधीचं सरकार सत्तेवर असतं, तर तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हायला अजून 20 वर्षे लागली असती. योजना आधीही होत्या, आताही आहेत. मात्र त्यावेळच्या योजनांची अंमलबजावणी फक्त आणि फक्त मतपेढी डोळ्यासमोर ठेवून केली जायची, अशी टीका मोदींनी केली. शिर्डीत आलेल्या मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांची चावी देण्यात आली. यानंतर मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.