ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.४ - काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने पुन्हा एकदा जोरदार दणका दिला. आदर्श घोटाळ्यातील आरोपपत्रातून चव्हाण यांचे नाव वगळण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
मुंबईतील कुलाबा येथे कारगील युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट ही राजकीय नेते व सरकारी अधिका-यांनी लाटल्याचे समोर आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नावही घोटाळ्यात आल्याने चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. या घोटाळ्यातील आरोपपत्रातून नाव वगळावे अशी याचिका अशोक चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. बुधवारी हायकोर्टाने नाव वगळण्यास नकार देत याचिका फेटाळून लावल्याचे समजते. यापूर्वी सीबीआयनेही घोटाळ्यातून अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्याची याचिका दाखल केली होती. मात्र त्यावेळीही हायकोर्टाने सीबीआयची याचिका फेटाळून लावली होती. लागोपाठ दुस-यांदा हायकोर्टाने नाव वगळण्यास नकार दिल्याने चव्हाण यांची आदर्श सुटका सध्या तरी शक्य नाही असे दिसते.