मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आगामी विधानसभेत नसणार असल्याची खंत बोलून दाखवली. कुंकवाविना सुवासिनी सहन होत नाही, तसेच, एकनाथ खडसेंविना विधानसभा सहन होत नाही, असे भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी म्हटलं होतं. अशी आठवण एकनाथ खडसेंनी सांगितली. तसेच, आगामी विधानसभेत मी नसणार आहे, याची खंत आयुष्यभर मला राहिल. मी गेली 38 वर्षे विधानसभेत कामकाज केलं आहे. मात्र, आता विधानसभेत मी नसेन, याची खंत मला कायम राहिल, असे म्हणत खडसेंनी नाराजी व्यक्त केली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले आहेत. तिकीट नाकारल्यानंतर अनेकदा त्यांनी आपली नाराजगी व्यक्त केली होती. मात्र, निवडणूक निकालाच्या आदल्यादिवशी पुन्हा एकदा खडसेंना नाराजी बोलून दाखवली. मी गेल्या 38 वर्षे विधानसभेत होतो. विधानसभेत मी अतिशय आक्रमकपणे मतदारसंघाचे, राज्याचे प्रश्न मांडले. मला, तीन वर्षासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यावेळी, भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी माझ्या अनुपस्थितीबद्दल खंत व्यक्त केली होती. तसेच, एखाद्या सुवासिनीला कुंकवाशिवाय पाहणं हे सहन होत नाही, तसेच विधानसभेला एकनाथ खडसेंशिवाय पाहणं मला सहन होत नाही, असं वर्णन प्रमोद महाजन यांनी केलं होतं, अशी आठवण खडसेंनी सांगितली.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका राज्यात शांततेत पार पडल्या असून उद्या निकाल जाहीर होत आहे. राज्यात भाजपा-सेना युतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल, असा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे, सत्ता असतानाही आता आपण विधानसभेत नसू याची खंत एकनाथ खडसेंना वाटते. एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर रोहिणी खडसेंचा विजय झाल्यास, यंदाच्या विधानसभेत एकनाथ खडसेंऐवजी रोहिणी खडसे दिसणार आहेत.