मुंबई - एकेकाळी बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच मतदारसंघांवर वर्चस्व राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था फारच बिकट झाली आहे. राष्ट्रवादीतील दिग्गज नेते गळाला लागल्याने भाजपने जिल्ह्यात मोठी ताकद निर्माण केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत असताना जिल्ह्यात शिवसेनेची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच लढती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात प्रभाव निर्माण केला. राष्ट्रवादीचे नेते रमेश अडसकर, सुरेश धस यांच्यासह इतर नेत्यांना पक्षात घेऊन पक्षाला मजबूत केले. परळी नगर परिषद वगळता जिल्ह्यात सर्व ठिकाणी पंकजा यांनी भाजपला वर्चस्व मिळवून दिलं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही प्रितम मुंडे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निकालावरून विधानसभेला भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीला खडतर परिश्रम करावे लागणार आहेत.
दहा वर्षांपूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीचे सहापैकी पाच आमदार होते. २०१४ मध्ये केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्या रुपाने एक जागा राष्ट्रवादीला जिंकता आली. परंतु, २०१९ येईपर्यंत क्षीरसागर देखील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे शिवसेनेला बीडमध्ये संधी निर्माण झाली. तर राष्ट्रवादी शुन्यावर गेली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोपळा फोडण्याचे आव्हान आहे. त्यानंतर इतर मतदारसंघातील विजयावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
परळीतून राष्ट्रवादीला सर्वाधिक आशा
सध्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही विधानसभा आमदार राहिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्तेही निराश झाले आहेत. परंतु, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून पक्षाला मोठ्या अपेक्षा आहे. धनंजय मुंडे परळीतून निवडणूक लढविणार हे निश्चित असून त्यांची लढत बहिण पंकाज मुंडे यांच्याशी होणार आहे. लोकसभेला परळीतून भाजपला २० हजारांचे मताधिक्य आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्यासमोरही ही जागा जिंकण्याचे आव्हान आहे. ही जागा आपणच जिंकू अशी आशा राष्ट्रवादीला आहे.