मुंबई : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत.
या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगलेच बहुमत स्पष्ट मिळाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची आगेकूच होत आहे. हा लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव संपला आहे. हे या पाच राज्यांच्या निकालावरुन सिद्ध झाले आहे. एकप्रकारे धनशक्तीवर जनशक्तीचा हा विजय आहे. आगामी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये देशात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है, असे अशोक चव्हाण म्हणाले.
याशिवाय, सध्या या राज्यांमध्ये जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार काही महिन्यापुरतेच राहिल आणि महाराष्ट्रात सुद्धा असेच चित्र पाहिला मिळेल, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पाचपैकी एकाही राज्यात भाजपाला सत्ता मिळविण्यात यश आले नाही. तर, राजस्थानमध्ये सत्ता राखण्यातही भाजप अपयशी ठरल्याचे दिसून येते. तर मध्य प्रदेशमध्येही अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे तेलंगणात तेलुगू जनतेनं भाजपाला स्पष्टपणे नाकारलं आहे. तेलंगणात भाजपला अद्याप 2 जागांवर आघाडी असून संपर्ण निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आह. तर मिझोरमध्ये एमएनएफ पक्षाला सर्वात मोठी आघाडी मिळाल्याचे दिसून येते.