मुंबई : पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. गेले काही दिवस विदर्भात पूरपरिस्थितीचा आढावा आणि विविध कामांसंबंधी दौरे केले. यादरम्यान मला कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यामुळे चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
"गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये," असे नाना पटोले यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. या दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार असून ज्या आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर खासदार नवनीत राणा कौर आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती.