ठाणे : मुंबईच्या वेशीवर असलेले ठाणेही दहशतवाद्यांच्या रडार वर असताना, राज्याच्या गृह विभागाने दिवाळीच्या मुहूर्तावर दहशतवादविरोधी पथकाच्या ठाणे युनिटसाठी अतिरिक्त ३८ जणांचे मनुष्यबळ मंजूर केले आहेत. त्यामुळे या ठाण्यातील संभाव्य धोक्यांसह संवेदनशील स्थळांकडे लक्ष केंद्रीत करण्यास अधिक मदत होईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. २०१६ मध्ये मुंब्य्रातून इसीस संघटनेचा म्होरक्या मुद्दबीर याला अटक करण्यात आली होती. कल्याणातील चार तरुण इसीस संघटनेत सामील होण्यास गेले होते. मुंब्य्रातील नागलाबंदर येथे १९९८ साली आरडीएक्स सापडले होते. तसेच ठाणे शहरातून-मुंब्रा येथून लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांच्या तसेच नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात ठाणे गुन्हे शाखा आणि दहशतवादी पथकाला यश आले होते. अशा वारवांर होणाऱ्या घटना तसेच ठाणे हे मुंबईच्या वेशीवर असल्याने येथे स्वतंत्र दसङतवादविरोधी पथकाची गरज असल्याचे म्हणणे वारंवार मांडले जात होते. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यक्षेत्रात मुंब्रा, भिवंडी, पडघा, कल्याण अशी संवेदनशील ठिकाणे आहेत. दहशतवादाचे बदलते स्वरूप लक्षात घेता, त्याच्या बीमोडासाठी स्वतंत्र मनुष्यबळ असण्याची गरज होती. दहशतवादी संघटनांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या हस्तकांची माहिती घेणे, त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवणे ही कामे आता पूर्वीपेक्षा अधिक सक्षमपणे करता येतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अतिरिक्त मनुष्यबळाने संभाव्य कारवायांना आळा
By admin | Published: October 31, 2016 5:21 AM