रॅडिकोविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ

By Admin | Published: June 27, 2015 02:09 AM2015-06-27T02:09:54+5:302015-06-27T02:09:54+5:30

सार्वजनिक नदी, नाल्यात केमिकल कालविणे हा गंभीर गुन्हा आहे. तो गुन्हा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको कंपनीने गेली अनेक वर्षे राजरोसपणे केला.

Avoid reporting crime against Radico | रॅडिकोविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ

रॅडिकोविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ

googlenewsNext

औरंगाबाद : सार्वजनिक नदी, नाल्यात केमिकल कालविणे हा गंभीर गुन्हा आहे. तो गुन्हा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको कंपनीने गेली अनेक वर्षे राजरोसपणे केला. मात्र, केवळ या कंपनीत राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा पालवे यांचे पती चारुदत्त पालवे यांची भागीदारी असल्यानेच या राजकीय दबावापोटीच कंपनीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
रॅडिकोविरुद्ध सर्व पुरावे, अहवाल असतानाही मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? असा प्रश्न पोलीस, महसूल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच या तिन्ही विभागांनी आतापर्यंत केवळ कागदी घोडे नाचविण्याचेच काम केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांची कागदोपत्री कारवाई
रॅडिको कंपनी आपले घातक रसायन थेट कुंभेफळच्या नाल्यामार्गे सुखनात सोडत असल्याची तक्रार ३१ मार्च रोजी मराठवाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने करमाड ठाण्यात केली. मध्यरात्री सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सहायक फौजदार आर. डी. चव्हाण व सहकाऱ्यांना तपासणीसाठी पाठविले. पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तेव्हा रॅडिको नाल्यात विष सोडत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ९ एप्रिल रोजी सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रॅडिको कंपनी ही आपले घातक रसायन नाल्यास सोडत असून, नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कंपनीविरुद्ध सीआरपीसी कलम १३३ (ख) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल बनविला आणि तो औरंगाबादच्या तहसीलदारांकडे पाठवून देत कागदोपत्री कारवाईची केवळ औपचारिकता पार पाडली.
पोलिसांचा असाही भेदभाव
वास्तविक पाहता ग्रामीणचे सहायक अधीक्षक पोद्दार यांनी तहसीलदारांना अहवाल पाठविण्याऐवजी स्वत: ही फिर्यादी होऊन या कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविता आला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. दुसरीकडे रॅडिकोप्रमाणेच शहरातील खाम नदीत एका कंपनीचे घातक केमिकल मिसळण्यात येत होते. औरंगाबाद शहर पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलिसांनी छापा मारून केमिकल ओतणाऱ्या आठ जणांना अटक केली. त्यातील अनेक आरोपी गेल्या चार महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. खाम नदीत जसे विष कालविण्यात येत होते, त्याच प्रकारचा गुन्हा रॅडिकोकडून होत आहे. मग का गुन्हा नोंदविला नाही?, असा प्रश्न उपस्थित होतो.

Web Title: Avoid reporting crime against Radico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.