बाळासाहेब ठाकरे एकट्या शिवसेनेचे नाहीत : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 02:43 AM2018-10-28T02:43:26+5:302018-10-28T06:35:25+5:30
शिवसेना अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर चालते. सेनेच्या टीकेला मी फारसे महत्त्व देत नाही, असे अजित पवार म्हणाले
कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेची ओळख आहे. ते कुठल्या एका पक्षाचे नव्हे, तर महाराष्ट्राचे नेते असल्यामुळे त्यांच्या स्मारकाविषयी बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. मग आम्ही विचारणा केली तर उद्धव ठाकरे यांना एवढ्या मिरच्या का झोंबल्या, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, राम मंदिराला विरोध नाही, पण जनतेच्या भावनेला हात घालून मते मागण्याच्या प्रवृत्तीला आमचा आक्षेप आहे. आम्ही व आमचा पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच काम करतो. शिवसेना अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर चालते. सेनेच्या टीकेला मी फारसे महत्त्व देत नाही. सेनेकडून चांगली भाषा अपेक्षा करणेच मुळात चुकीचे आहे.
सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना समविचारीच्या कक्षेत आणून त्यांच्याशी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मित्रपक्षांसह राज्यातील ४८ जागांसाठी यावेळी २४:२४ असा फॉर्म्युला निश्चित मानून चर्चा सुरू असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.