बालभारतीमार्फत विद्यार्थ्यांना पुस्तक वितरणास सुरुवात; ऑनलाइन नोंदणी उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:27 PM2020-05-23T16:27:53+5:302020-05-23T16:41:59+5:30
राज्यातील सर्व भांडारांमधून पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू
पुणे : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इयत्ता १ ली ते ११ वी च्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत शनिवारीपासून
पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली.
शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुणे विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास सुरुवात झाली. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप,वित्त व लेखा अधिकारी अंकुश नवले, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, पुणे भांडार व्यवस्थापक विनोद अस्मर आदी उपस्थित होते. समग्र शिक्षा अभियानानंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी शासकीय व स्थानिक स्वराज संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांना पुणे विभागात ९५,९०,३२४ इतक्या प्रतींचे वितरण केले जाणार आहे. तसेच खुल्या बाजारात पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
-----------
पीडीएफ पुस्तकांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद
बालभारतीतर्फे खासगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून दिली जातात. संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पीडीएफ पुस्तकांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 81 लाख पीडीएफ झाल्या डाऊनलोड आल्या आहेत.त्यात आजपर्यंत इयत्ता बारावीच्या 20 लाख 54 हजार 194 व इयत्ता 1 ली ते 11 वी च्या 61लाख 20 हजार 753 पीडीएफ फाईल्स डाऊनलोड केल्या गेल्या आहेत,असे असुनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी होत असल्याने पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली .
-----
पाठ्यपुस्तकांसाठी करता येणार ऑनलाइन नोंदणी
राज्यातील संचारबंदीच्या काळात मंडळाच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्हणून मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्याकरीता पाठ्यपुस्तक मंडळाने यंत्रणा विकसित केली आहे. पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाईन पद्धतीने 24 तासात केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून त्याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या sales.ebalbharati.in या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविता येणार आहे.त्यामुळे वेळेची बचत होणार असून भांडारांमधील गर्दी टाळता येणे शक्य होणार आहे.