डान्सबार बंदीचे विधेयक जूनमध्ये
By admin | Published: May 8, 2014 12:34 AM2014-05-08T00:34:44+5:302014-05-08T14:18:46+5:30
राज्यातील डान्सबार बंदीसाठीचे सर्वंकष विधेयक २ जूनपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनात मांडणार : अतिरिक्त अर्थसंकल्प ५ जूनला
मुंबई : राज्यातील डान्सबार बंदीसाठीचे सर्वंकष विधेयक २ जूनपासून सुरू होणार्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी ही माहिती पत्रकारांना दिली. राज्य शासनाने डान्सबार बंदीचा ऐतिहासिक कायदा केला होता. त्याची सर्वत्र प्रशंसादेखील झाली होती. तथापि तो न्यायालयात टिकू शकला नाही. मात्र डान्सबारसाठीच्या परवान्यांचे नूतनीकरण राज्य शासनाने न केल्याने डान्सबार सुरू होऊ शकले नाहीत. डान्सबारमालकांनी त्याविरुद्ध दाद मागितली असता परवान्यांचे नूतनीकरण का केले नाही, याबाबत १५ दिवसांच्या आत बाजू मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात डान्सबार बंदीचे सर्वंकष विधेयक आणले जाणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले की, आधीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून दुरुस्ती विधेयक आणायचे की नवेच विधेयक आणायचे, याबाबतचा निर्णय येत्या आठवड्यात घेण्यात येईल. पावसाळी अधिवेशनात ५ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे मागील अधिवेशनात केवळ अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. बुधवारी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, कार्यक्रम पत्रिकेला मान्यता देण्यात आली.
१३ विधेयके मांडण्यात येणार या अधिवेशनात प्रलंबित असणारी ७ जुनी विधेयके आणि ६ नवीन, अशी १३ विधेयके मांडण्यात येणार आहेत. ७ जुन्या विधेयकांपैकी ३ विधेयके संबंधित विभागांनी मागे घेतली होती. नव्या सुधारणांसह सदर ३ विधेयके पुनर्स्थापित करण्यात येतील. या जोडीलाच राज्यातील दुष्काळ, गारपीट, कायदा-सुव्यवस्था, दलित अत्याचार आदी प्रश्नांवरही चर्चा केली जाईल. अशासकीय कामांसाठी एक दिवस राखून ठेवण्यात आला आहे.