ठाणे : भारतात कोरोनाचे सावट असताना गणेशभक्त साधेपणाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. अमेरिकेतही या संकटकाळात बाप्पाचा गजर होत आहे. मूळचे ठाणेकर आणि सध्या अमेरिकेत वास्तव्य करीत असलेले पेणकर कुटुंब घरातल्या सदस्यांसोबत गणेशोत्सव साजरा करीत आहेत. कोरोनामुळे बऱ्याचशा वस्तू न मिळाल्याने घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून त्यांनी बाप्पाची सजावट साकारली आहे.
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी या कुटुंबाने पाच दिवसांचा गणेशोत्सव दहा दिवसांचा केला आहे. न्यू यॉर्क शहरात हे कुटुंब राहत आहे. कोरोनामुळे यंदा अमेरिकेत मूर्ती न आल्याने या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी ती मिळेल की नाही? ही शंका होती. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये त्यांनी मूर्तीविषयी विचारणा केली. परंतु, गेल्या वर्षीच्याच मूर्ती विकल्या जाणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्या वेळी केवळ दहाच मूर्ती शिल्लक होत्या आणि त्या दहामध्ये आपला नंबर लागण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. सुदैवाने त्यांना मूर्ती मिळाली आणि ती दहा दिवस आधीच घरात आणावी लागली. परंतु, ती मिळाली नसती तर घरातच मातीपासून किंवा चॉकलेटच्या बाप्पाचा पर्याय ठेवला होता, असे वैशाली पेणकर यांनी सांगितले. पूजेसाठी दूर्वा आणि नारळ न मिळाल्याने त्यांनी दूर्वांऐवजी तुळस तर नारळाऐवजी शहाळे ठेवले. कोरोनामुळे बाजारात सजावटीच्या पुरेशा वस्तू नसल्याने त्यांनी घरात उपलब्ध असलेले खोके, भेटवस्तू आणि ख्रिसमसमध्ये वापरली जाणारी चांदणी यांचा वापर करून सजावट केली आहे. तसेच, एक सुंदरसे पेंटिंगही त्यांनी केले असून, यात त्यांची मुलगी रिजुल हिनेदेखील मदत केली आहे.गाणी लावून उत्सवाचा आनंदगेल्या वर्षी भारतीय मित्रमंडळींना निमंत्रण दिले होते. परंतु, यंदा कोरोनामुळे घरातल्या सदस्यांसोबत साजरा केला जात आहे. वैशाली यांचे पती संदेश, मुलगी रिजुल आणि मुलगा ध्रुव हे गणपतीची गाणी लावून, फेऱ्यांची गाणी म्हणून आनंद लुटत आहेत.