बेळगाव : ‘तुमचं आमचं नातं रक्ताचं आहे, महाराष्ट्राचं आहे. बेळगाव सीमावासीय गेल्या साठ वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत, आपल्या लढाईला माझा मानाचा मुजरा आहे. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई मतांची नाही तर मातीची आहे.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी केले. बेळगाव येथील टिळकवाडी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कर्नाटक विधीमंडळ अधिवेशन विरोधात आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते.धनंजय मुंडे म्हणाले, कर्नाटक सरकारला अधिकृत दौरा कळवून इथं आलो, त्यांनी प्रोटोकॉल पाळायला नकार दिला, पण मी इथे प्रोटोकॉलसाठी नाही तर माझ्या महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी इथे आलो आहे. महाराष्ट्राची १२ कोटी जनता तुमच्या सोबत आहे. माझ्या नेत्यांनी म्हणजे शरद पवार यांनी या लढाईत पाठीवर काठी खाल्ली आहे; मी तुम्हाला शब्द देतो की जीवात जीव असेपर्यंत मी तुमच्या हक्कासाठी लढत राहीन. अन्यायी कर्नाटक सरकारला नक्की आपल्या लढ्यापुढे झुकावेच लागेल.बेळगावप्रश्नी मी त्वरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भाग पाडू’ असे म्हणत धनंजय मुंडे यांनी ही लढाई आता तरुणांनी हाती घ्यावी, असे आवाहन केले. या मेळाव्यास एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे, प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, उपमहापौर मधुश्री पुजारी आदी उपस्थित होते.मेळाव्यासाठी मुंडे मध्यरात्रीच बेळगावातधनंजय मुंडे यांनी कर्नाटक सरकारचा प्रोटोकॉल न घेता रविवारी मध्यरात्रीच बेळगाव गाठले होते. पोलिसांचा विरोध झुगारत त्यांनी टिळकवाडी येथील मेळावास्थळी प्रवेश केला. त्यावेळी ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. मेळावा ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्नाटक पोलिसांची दडपशाही झुगारून मराठी भाषकांनी मेळावा यशस्वी करून दाखविला.
सीमावासीयांची लढाई मतांची नव्हे, तर मातीची- धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 1:18 AM