पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज अस्वस्थ आणि संतप्त झाला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने, आणि विविध प्रकारचे आंदोलनांच्या माध्यमातून हा समाज आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ( एमपीएससी)ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आता शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार शरद पवारांकडे सुद्धा तशी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचं कारण म्हणजे ठाकरे सरकार शरद पवारांचा शब्द कधीच खाली पडू देत नाही असेही ते म्हणाले.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मेटे म्हणाले, मराठा विचार मंथन बैठकीचे राज्यातील अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यात छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचा देखील समावेश आहे. मी स्वतः त्यांच्याशी बैठकीविषयी बोललो होतो आणि त्यांना निमंत्रण देखील दिले होते. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना बैठकीला येतो असे सांगितले होते. मात्र का कुणास ठाऊक या दोन्ही राजेंनी आजच्या बैठकीला गैरहजेरी लावली.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या लढाईत पुढे येण्याचे अनेकांना आवाहन केले आहे. पण बरेच जण या लढाईत पुढाकार घेण्यास तयार नाही. ज्या कुणास नेता व्हायचे आहे त्यांनी खुशाल व्हावे पण त्याचवेळी त्यांनी आपल्या विचारांवर तरी ठाम राहावे असेही मेटे यावेळी म्हणाले.