बीड : बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक, घातपाताचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 09:24 AM2018-03-04T09:24:49+5:302018-03-04T09:29:13+5:30
दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बीड : येथील गटसाधन केंद्रात शनिवारी झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शनिवारी बारावीचा गणिताचा तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयाचा पेपर झाला. तालुक्यातील ७ परीक्षा केंद्रांवर बारावीची तर ३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली. परीक्षा संपल्यानंतर गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांनी सर्व उत्तरपत्रिका स्वत: तपासून घेत गटसाधन केंद्रात ठेवल्या. साडेपाच वाजेच्या सुमारास ते निघून गेले. त्यानंतर रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गटसाधन केंद्रातून धूर निघत असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ ढवळे यांना दिली. त्यांनी धाव घेत गटसाधन केंद्र उघडले, तत्पूर्वीच बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. हा सर्व प्रकार मुद्दामहून केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याची नोंद झाली नव्हती. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.
खिडकीच्या कडेला आढळली सुतळी-
ज्या खोलीमध्ये उत्तरपत्रिका होत्या त्याच्या बाजूलाच एक खिडकी आहे, या खिडकीतून सुतळी लोंबकळताना दिसून आली. विशेष म्हणजे या खोलीमध्ये वीज नसल्याने हा सर्व प्रकार घातपातच आहे, असे बोलले जात आहे.
या सात केंद्रांतील उत्तरपत्रिका खाक-
वसंत महाविद्यालय, केज, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, केज, रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, केज, पुरुषोत्तमदादा सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय सारणी (आनंदगाव), काळेगाव कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव घाट, श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहिफळ (वडमाऊली), युसूफवडगाव कनिष्ठ महाविद्यालय, युसूफवडगाव, जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय, नांदूरघाट या केंद्रांवर झालेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. दहावीचे केंद्र समजू शकले नाहीत.
सुरक्षितता चव्हाट्यावर-
जिल्ह्यात दहावीचे १५ परीरक्षक केंद्र आहेत तर बारावीचे १४ एवढे आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या केंद्रांमध्ये बंद असते. परंतु शिक्षण विभागाकडून या केंद्रांना सुरक्षा नसते. त्यामुळेच अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे. या घटनेच्या निमित्ताने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला-
या १० केंद्रांवर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आगीत खाक झाल्या आहेत. आता आपले पुढे काय होणार? बोर्ड काय निर्णय घेणार? याबाबत विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आता बोर्ड या विद्यार्थ्यांची नव्याने परीक्षा घेणार की, यावर वेगळा तोडगा काढणार हे वेळच ठरवेल.