ऑनलाइ लोकमतनागपूर, दि. २७ : राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची राज्य शासनाकडून घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याच विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.भाऊ दायदार यांना उत्कृष्ट समन्वयक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. २०१५-१६ या वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नि:स्वार्थ भावनेने काम केलेल्यांचा हे पुरस्कार देऊन राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येणार आहे. विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम हाती घेतले जातात. रक्तदान, पर्यावरण जनजागृती, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यटन विकास, शाळाबाह्य मुलांचे संरक्षण, एड्स जनजागृती, आदी विषयांत या विभागाने चांगली कामगिरी केली आहे. ग्रामीण भागात बंधारे बांधणे, वैचारिक प्रबोधन करणे, झोपडपट्टीतील लोकांशी संवाद साधणे या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचे कार्य केले जाते.