गिरीश राऊतखामगाव, (जि.बुलडाणा), दि. 17 : आपल्या भाग्यात काय हे अनेकजण तळहातावरील ‘भाग्यरेषा’ पाहून ठरवितात. मात्र भाग्य त्यांचेही असते ज्यांचे हातावर भाग्यरेषाच काय ज्यांना हातही नसतात. असेच प्रेरणादायी उदाहरण ८ वर्षीय चिमुकला विश्वजीतचे ठरत आहे. खामगाव तालुक्यातील आडवळणाच्या खेडेगावात राहणाऱ्या संजय बोराडे यांचा चिमुकला विश्वजीत हा जन्मत: दिव्यांग. विश्वजीतला खांद्यापासून दोन्ही हात नाहीत. यामुळे नाही म्हटले तरी काही काळ विश्वजीतच्या भविष्याबद्दल त्याचे आई-वडिलांसोबत कुटुंबीयांना चिंता वाटली. मात्र समजायला लागल्यापासून विश्वजीतने आपल्या कर्तृत्वाने कुटुंबीयांची चिंता मिटविली. विश्वजीत हा ओझे न बनता एक आश्चर्य व आदर्श बनला आहे.
विश्वजीत हा गावाजवळील रोहणा येथील श्री गुरुदेव इंग्लिश स्कुलमध्ये शिकतो. विशेष म्हणजे गतवर्षी के.जी.२ या वर्गातून विश्वजीत हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. विश्वजीतचे अक्षर इतरांनाही लाजविणारे असे सुवाच्च आहे. हात नसले तरी तो स्नान, केस विंचरणे, जेवण, लेखीकाम, अभ्यास करताना पाने उलटणे, सायकल चालविणे आदी कामे स्वत:च अगदी सहजपणे आश्चर्यकारक पार पाडतो. आपल्या जिद्द व इच्छाशक्तीच्या बळावर त्याने दिव्यांगावर बालवयातच मात केली आहे. हात नसले तरी जिद्द व बुध्दीच्या जोरावर भविष्यात मोठे होण्याचा मानस सुध्दा विश्वजीतने व्यक्त केला आहे.