पडदा उघडण्यापूर्वीच नको भैरवी!--बेळगावात नांदी झालीच पाहिजे!

By admin | Published: December 12, 2014 10:18 PM2014-12-12T22:18:22+5:302014-12-12T23:41:32+5:30

बेळगाव नाट्यसंमेलन : नटेश्वराचा उत्सव रद्द न करण्याची सातारच्या रंगकर्मींची सीमाभागातील मराठी माणसाला विनंती

Bhairavi should not be opened before opening the screen! - Need to be started in Belgaum! | पडदा उघडण्यापूर्वीच नको भैरवी!--बेळगावात नांदी झालीच पाहिजे!

पडदा उघडण्यापूर्वीच नको भैरवी!--बेळगावात नांदी झालीच पाहिजे!

Next

राजीव मुळ्ये - सातारा -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांची काही वक्तव्ये आणि त्यामुळे नाराज झालेल्या नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने आगामी नाट्य संमेलन घेण्यास दर्शविलेला नकार या घटनाक्रमाचे तरंग सातारच्या नाट्यवर्तुळातही उमटले. नाराजी बंद दरवाजाआड व्यक्त व्हावी; मात्र संमेलन रद्द होऊ नये, अशी कळकळीची अपेक्षा व्यक्त होत आहे. ही कळकळ व्यक्त करणारे पत्र नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने बेळगाव शाखेला लगेच धाडले आहे. संमेलनाचा पडदा उघडण्यापूर्वीच भैरवीचे सूर ऐकून रंगकर्मी व्यथित झाले आहेत.
‘महाराष्ट्र राज्य’ असा उल्लेख असलेला फलक सीमाभागातील येळ्ळूर गावातून हटविल्यानंतर तेथे उमटलेले तीव्र पडसाद हीच बेळगावला नाट्य संमेलन घेण्याच्या निर्णयाची पार्श्वभूमी ठरली. त्यामुळे सीमाभागातील मराठीजनांच्या भावनांना संमेलनाच्या व्यासपीठावर वाचा फुटणे अपेक्षितच आहे, असे काहींचे मत आहे. हटविलेला फलक मराठी बांधवांनी पुन्हा लावल्यावर येळ्ळूरमध्ये अनेकांना घरातून ओढून मारहाण करण्यात आली होती. या घटनांचा निषेध करण्यास मराठी रंगकर्मींना उशीर झाला आणि सीमाभागात संताप व्यक्त करण्यात आला. बेळगावात नाट्य संमेलन भरवून याची भरपाई करता येईल, या हेतूनेच तेथे संमेलनाचा घाट घातला गेला. तथापि, हे कलावंतांचे व्यासपीठ असल्यामुळे राजकीय विषय संमेलनात होणार नाहीत, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितल्याने पुन्हा संताप उफाळून आला. नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने हे संमेलन होऊ शकणार नाही, असे जाहीर करून टाकल्याने या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.
त्या पार्श्वभूमीवर, सीमाभागात मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा कोणताही मराठी कार्यक्रम रद्द होता कामा नये, अशा प्रतिक्रिया नाट्य वर्तुळात उमटत आहेत. मराठी माणसाला क्षीण बनविण्यासाठी कर्नाटक सरकारचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असताना आपापसातील मतभेद इतके टोकाला जाता कामा नयेत, संमेलन झालेच पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे बेळगाव शाखेला याबाबत पत्र पाठविण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत संमेलन रद्द करण्याचा पर्याय स्वीकारू नये, अशी विनंती करण्यात आली आहे....


सातारा शाखेतर्फे दरवर्षी ‘चलो बेळगाव’
मराठी माणसांच्या जमिनीवर आरक्षण टाकणे, त्या जमिनी औद्योगिक क्षेत्राखाली आणणे, असे मार्ग वापरून मराठी माणसाला क्षीण करणारे कर्नाटक सरकार मराठी नाटकाची गाडी दिसताच भरमसाठ कर आकारते. त्यावर, बेळगावातच नाटकाचे नेपथ्य तयार करायचे आणि येथून फक्त कलावंतांनी जाऊन सीमाभागात प्रयोग सादर करायचे, असाही उपाय योजावा लागला होता. मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा घालण्याच्या कर्नाटकच्या खटाटोपांना उत्तर देण्यासाठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे दरवर्षी एक तरी मराठी कार्यक्रम सीमाभागात आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा या निमित्ताने करण्यात आली आहे.


बेळगावच्या संमेलनाला येळ्ळूरच्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे. अशा स्थितीत संमेलनाच्या व्यासपीठावर मराठी माणसांच्या व्यथा आणि भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. किंंबहुना तेथे संमेलन घेतल्यामुळे मराठी माणसांच्या प्रश्नांना वाचा फुटून त्यांना बळ मिळणार आहे. त्यामुळे बेळगावला संमेलन झालेच पाहिजे.
- शिरीष चिटणीस,
अध्यक्ष, नाट्य परिषद, शाखा सातारा


नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी असेल, तर ती त्यांनी व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही. परंतु संमेलनच रद्द करण्याचा निर्णय घेणे योग्य नाही. तेथे संमेलन व्हावे, अशाच राज्यभरातील रंगकर्मींच्या भावना असून, तसे पत्र सातारा शाखेतर्फे बेळगावला पाठविले आहे.
- राजेश मोरे, कार्यवाह,
नाट्य परिषद, शाखा सातारा


मराठीच्या संवर्धनासाठी जे-जे उपयुक्त असेल, ते-ते बेळगाव आणि सीमाभागात झालेच पाहिजे. राजकीय चर्चा करण्याचे हे व्यासपीठ असावे की नसावे, यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. परंतु संमेलन रद्द होऊ नये; कारण संमेलनाला मिळणारा भरघोस प्रतिसादच बेळगावातील मराठी माणसांची शक्ती सिद्ध करण्याचे साधन असेल.
- श्रीकांत देवधर, ज्येष्ठ रंगकर्मी, सातारा


मराठी माणसाला सीमाभागात हक्कांसाठी भांडावे लागतेच आहे. त्याला आता मराठी भाषकांशीही भांडावे लागू नये. वादविवाद, मतभेद यामधून चर्चेद्वारे सुवर्णमध्य काढला पाहिजे. परंतु बेळगावात नाट्य संमेलन व्हायलाच पाहिजे आणि वादांवर तोडगा काढण्यासाठी सुजाण रंगकर्मींनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजेत.
- रवींद्र डांगे, अभिनेते-दिग्दर्शक, सातारा

Web Title: Bhairavi should not be opened before opening the screen! - Need to be started in Belgaum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.