मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाडाच्या घोळानंतर अखेर 49 ठिकाणी फेरमतदान होणार आहे.भंडारा-गोंदियात काल (दि.28) मतदान पार पडले. मात्र, काही ठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. काल मतदानाला सुरूवात झाल्यानंतर अर्धा ते एक तासानंतर ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशीममध्ये बिघाड आल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे काही मतदान केंद्रावरुन शेकडो मतदारांना मतदान न करताच परत जावे लागले. तर निवडणूक विभागाने गोंदिया शहरातील 10 मतदान केंद्रात एैनवेळी बदल केला. मात्र याची माहिती बऱ्याच मतदारांना नसल्याने त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. गोंदिया विधानसभा मतदार संघातील 65 मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशीनमध्ये बिघाड असल्याच्या लेखी तक्रारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत वालस्कर यांना प्राप्त झाल्या. त्यानंतर या तक्रारींची चाचपणी करुन वालस्कर यांनी 35 केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबविण्याचे आदेश काढले होते.दरम्यान, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये काल झालेल्या बिघाडाच्या घोळानंतर निवडणूक आयोगाने आज एकूण 49 ठिकाणी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले.
Bhandara–Gondiya Bypoll 2018 : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या गोंधळामुळे 49 ठिकाणी होणार फेरमतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 6:21 PM