सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- शहरातील अनेक बिअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपान होत असल्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांच्यावर कारवाई न करता ‘अर्थ’पूर्ण चुप्पी साधली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिणामी पादचारी नागरिक व रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शहरातील बिअरशॉपी चालकांकडून नियम धाब्यावर बसवत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे प्रकार सुरू आहेत. मात्र उघडपणे चालणाऱ्या या प्रकाराकडे उत्पादन शुल्क विभागाकडून होणारे दुर्लक्ष म्हणजे ‘अर्थ’पूर्ण चुप्पी असल्याचा संशय सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. तर पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई केल्यानंतरही काही दिवसात पुन्हा बिअरशॉपीबाहेरचे गैरप्रकार सुरु होत आहेत. त्यामुळे तक्रार करायची तर कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.सीबीडी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर उघड्यावरचे ठिकाण तळीरामांचा शहरातला मोठा अड्डा झाला आहे. अग्निशमन दलाच्या भिंतीला लागूनच श्याम वाईन्सच्या बाहेरच दिवस-रात्र हा प्रकार सुरु असतो. मात्र त्याठिकाणी उघड्यावर मद्यपान केले जात असतानाही उत्पादन शुल्क विभागाचे व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. बिअरशॉपीचे परवाने देताना उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांना काही अटी व नियम घातले जातात. यामध्ये बिअरशॉपीबाहेर मद्यपान होवू नये या अटीचाही समावेश आहे. परंतु सर्व अटी व नियम धाब्यावर बसवत शहरातील अनेक बिअरशॉपीबाहेर मद्यपानाला अनुमती दिली जात असल्याचे दिसत आहे. काही बिअरशॉपी चालकांनी लगतचेच गाळे भाड्याने घेवून त्याठिकाणी ग्राहकांच्या बैठकीची सोय करुन दिलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गाळ्यांमध्ये अथवा उघड्यावर बेकायदा बार तयार झाले आहेत. बारऐवजी बिअरशॉपीबाहेरच उघड्यावर मद्यपान केल्यास ग्राहकाची पैशाची बचत होवू शकते. शिवाय घरी नेवून एका बाटलीवर भागवणारे देखील शॉपीबाहेर किमान दोन बाटल्या रिचवतात. यामुळे धंद्याला तेजी मिळत असल्यामुळे सर्रास बिअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपानाला बेकायदा परवानगी दिली जात आहे. यात तळीरामांचाही फायदा असल्यामुळे उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्राहकांसाठी चकण्याची सोय म्हणून बिअरशॉपीबाहेरची सार्वजनिक मोकळी जागा फेरीवाल्यांना भाड्याने देण्याचे प्रकार होत आहेत. परंतु पदपथ व्यापले गेल्यामुळे पादचारी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार घणसोली रेल्वेस्थानकासमोर मीना वाईनशॉपच्या बाहेर पहायला मिळत आहे. उघड्यावर मद्यपान केले जात असल्यामुळे पोलिसांनी सदर बिअरशॉपीवर यापूर्वी कारवाई देखील केलेली आहे. परंतु कारवाईनंतरही काही दिवसातच पुन्हा त्याठिकाणी उघड्यावर मद्यपानाला सुरवात झालेली आहे. यामुळे अशा शॉपीचालकांच्या पाठीशी छुपी ताकद असल्याचे स्पष्ट होत आहे.