नागपूर - अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ''गेल्या काही काळात नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीच्या प्रकियेची सुरुवात ही मार्च महिन्यांपासून होईल. तसेच कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल.''
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरले. सरकटक कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या घोषणेचे काय झाले असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून सभात्याग केला.
यावेळी राज्यातील राजधानीपासून दूरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात सीएमओ अर्थात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.