मोठी बातमी: बारामती की परभणी?; रासपच्या जागेबाबत सस्पेन्स संपला, जानकरांचा मतदारसंघ ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 02:40 PM2024-03-26T14:40:26+5:302024-03-26T14:44:05+5:30
Lok Sabha Election: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी महादेव जानकरांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात होती.
Mahadev Jankar ( Marathi News ) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी हा निर्णय घेतला. महायुतीने आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा सोडली असल्याची माहिती जानकरांकडून देण्यात आली होती. मात्र ही जागा नक्की कोणती असणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी महादेव जानकरांनाबारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र या सगळ्याबाबत आता महादेव जानकर यांनी खुलासा करत आपण परभणीतून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
महायुतीकडून रासपला परभणीची जागा सोडण्यात आली असून मी स्वत: या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त 'एबीपी माझा'कडून देण्यात आले आहे. महादेव जानकर यांनीच याबाबतचा खुलासा केल्याने ते बारामतीतून लढू शकतात, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
परभणी लोकसभेची जागा महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता होती. कारण या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संजय उर्फ बंडू जाधव हे विद्यमान खासदार आहेत. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांनी जाधव यांना चांगली लढत दिली होती. त्यामुळे महायुतीकडून यंदा राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. मात्र आता महादेव जानकरांच्या महायुतीतील समावेशाने विटेकर यांचा पत्ता कट झाल्याचं दिसत आहे.
चिन्हाबाबत काय म्हणाले महादेव जानकर?
महादेव जानकर हे बारामतीतून कमळ चिन्हावरही लढू शकतात, असंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर चिन्हाबाबत स्पष्टीकरण देताना जानकर यांनी म्हटलं होतं की, "माझा एक आमदार आहे, तो रासपच्या चिन्हावर आहे. मी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती, तीही माझ्याच चिन्हावर लढवली होती. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूकही मी रासपच्याच चिन्हावर लढणार," असा खुलासा जानकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केला आहे.