मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीबाबत घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 07:32 PM2024-04-18T19:32:33+5:302024-04-18T19:35:35+5:30
Chandrakant Khaire Political Retirement: अनेकांचे आमच्याकडे लक्ष आहे, परंतु विरोधक काय हालचाली करत आहेत याकडे आमचे लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यांचे जनतेकडे लक्ष नाहीय. ते फक्त आमदारांकडे लक्ष देत आहेत, अशी टीका खैरे यांनी केली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मविआकडून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात रस्सीखेच सुरु होती. अखेर खैरेंनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली. दानवेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. आता दोघांची दिलजमाई झाली असून दोघेही प्रचाराला लागले आहेत. अशातच आज चंद्रकांत खैरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
मी फक्त ही लोकसभा निवडणूक लढविणार आहे. पुढची लोकसभा लढविणार नसल्याची घोषणा खैरे यांनी केली. पुढच्या लोकसभेला अंबादास दानवे किंवा पक्ष जो उमेदवार निवडेल त्याने ती लढवावी, असेही खैरे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अंबादास दानवेंना पुढील पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे.
मी फक्त पुढची पाच वर्षे लढणार आहे. २०२९ च्या निवडणुकीला मी उभा राहणार नाही. अनेकांचे आमच्याकडे लक्ष आहे, परंतु विरोधक काय हालचाली करत आहेत याकडे आमचे लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यांचे जनतेकडे लक्ष नाहीय. ते फक्त आमदारांकडे लक्ष देत आहेत, अशी टीका खैरे यांनी केली.
शरद पवार आणि प्रियांका गांधी या प्रचाराला य़ेणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. 1989 पासून या शहराला शांत ठेवले आहे. इम्तियाज जलील यांनी कोणतं काम आणलं ते मला सांगा. त्यांना दिल्लीही माहिती नाही. भागवत कराड यांनाही दिल्ली माहीत नाही. आमच्याकडचे 5 ते 6 गद्दार आहेत, त्यांना आता तिकीटपण भेटलं नाही. ते आता रडत बसले आहेत, असा टोला खैरे यांनी लगावला.